पधारो म्हारे केरळा!

घूमर नृत्याची पेशकश

कोणत्याही नव्या प्रदेशाला भेट दिली कि तिथलं निसर्गसौंदर्य, तिथल्या खाण्याच्या विविध व्हरायटीज आणि तिथल्या शॉपिंगच्या गल्ल्या सोडल्या तर पर्यटक फारसे कुठे रमताना दिसत नाहीत.
पण जर तुम्हाला स्थानिक कलाकृती आणि पारंपरिक लोक कलांबद्दल आस्था असेल तर तुमच्या भटकंतीदरम्यान त्यांचा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे?
तर अशीच ही दोन ठिकाणं, जिथल्या मातीतले कलाविष्कार आपण आपल्या ‘ट्रिप’ दरम्यान अनुभवून आपली सफर आणखीन यादगार करू शकतो….

.

गवरी नृत्य

.

धरोहर फोक डान्स : उदयपूर, राजस्थान
बागोर कि हवेली

‘पद्मावत’ सिनेमात दीपिकाने ‘घुमर’वर धरलेला ताल असेल किंवा मामे खानचं ‘कोक स्टुडिओतलं’ ‘चौधरी’ गाणं असेल, आजवर विविध माध्यमातून राजस्थानी कला आपल्याला भुरळ घालत आली.
पण हवेलीतल्या ‘इंटिमेट’ वातावरणात, देश-विदेशातल्या पर्यटकांच्या सान्निध्यात बसून एकाच वेळी राजस्थानी कलाविष्काराची सफर करणं, हा अनुभव खरंच जगात भारी आहे!

कठपुतळ्यांचा पपेट शो

‘धरोहर’ म्हणजे वारसा.
या कार्यक्रमातून भिल्ल जमातीतल्या आदिवास्यांनी येऊन अंबादेवीचा भीमवळ राक्षसावर मिळवलेला विजय त्यांच्या ‘गवरी’ नृत्य-नाट्यातून पाहायला मिळतो. संध्याकाळच्या संधीप्रकाशात गुज्जर व सैनी समुदायाच्या नर्तिकांचं ‘चवरी’ नृत्य डोळ्यांना खऱ्या अर्थानं दिपवतं! यात प्रज्वलित केलेली माती व पितळेची भांडी डोक्यावर तोलत नर्तिका मोहक हालचाली करतात.
कमर आदिवासी जमातीच्या महिलांनी शरीरावर ‘मंजिरा’ (टाळ वाद्य) बांधून त्यातून निर्माण केलेली १३ पद्धतीच्या ध्वनीनादांची प्रस्तुती ‘तेरा ताली’ नृत्यप्रकारातून ऐकणंही सुखावह अनुभव असतो.
चेहऱ्यावर घुंगट (पदर), हातांच्या नाजूक रेखीव हालचाली आणि रंगीबेरंगी लेहेंग्याचा गोलाकार घेर करत एकमेकींभोवती धरलेला फेर ‘घूमर’ नृत्याद्वारे नर्तिका सादर करतात.
भट जमातीच्या वांशिक परंपरेतून राजस्थानच्या मनोरंजन विश्वात मोलाची भर घालणारा कठपुतळ्यांचा पपेट शो तर कार्यक्रमाला निराळीच उंची मिळवून देतो.

भवई नृत्य

‘धरोहर’च्या शेवटी वाळवंटातून दूरवर प्रवास करत पाणी आणायला निघालेल्या महिलांचा उत्सव ‘भवई‘ नृत्यातून बघायला मिळतो. यात नर्तिकांनी डोक्यावर एकामागून एक मातीचे तब्बल ९ घडे रचून ठेवलेले असताना देखील ते पेलवत, क्रमाक्रमाने वाढवत नेलेला हालचालींचा वेग

पाहताना आपण थक्क होऊन जातो!
त्यामुळे तुमच्या राजस्थान भटकंतीत; सारंगी, ढोलक, नगाडे आणि पेटीच्या वाद्यांवर सादर होणारी सुरेल सांगीतिक पेशकश आणि राजस्थानी संस्कृतीची झलक अनुभवायला उदयपूरमधल्या ‘धरोहर फोक डान्स’ कार्यक्रमाला जाणं चुकवू नका.

.

कडथनडन कलरी अँड नवरस कथकली सेंटर : केरळ.

थेक्कडी (पेरियार नॅशनल पार्क जवळ)

कथकली

हाऊसबोट्स, हत्ती आणि हवा तेवढा चहा म्हंटलं कि लगेच पावलं आपल्या ‘गॉड्स ओन कंट्रीकडे’ वळतात! निसर्गसौंदर्याबरोबरच ‘कथकली’, ‘मोहिनीअट्टम’ हे नृत्यप्रकार आणि ‘कलरीपयट्टू’ या मार्शल आर्ट पद्धतीचे उगमस्थळ म्हणून केरळची ख्याती सर्वदूर आहेच.
केरळ दौऱ्यावर असताना एकाच ठिकाणी यातले दोन अविष्कार अनुभवण्याची संधी आपल्याला ‘कडथनडन कलरी अँड नवरस कथकली सेंटर’ मध्ये मिळते.
पेरियार नॅशनल पार्क जवळ वसलेल्या थेक्कडी गावात हे सेंटर आहे.

‘कुझी’ म्हणजे खड्डा. सादरीकरणाच्या खोलीत, मधल्या भागात प्रात्यक्षिकांसाठी खणलेला मातीचा खड्डा आणि त्याच्या चहूबाजूंनी बसण्याची रचना या ‘कुझिकलरी’ पद्धतीने आपण कलरीपयट्टू बघू शकतो.
‘कलरी’ म्हणजे युद्धभूमी आणि ‘पयट्टू’ म्हणजे सराव.
पहिली मार्शल आर्ट्स विद्या म्हणून ख्याती असलेला हा तन-मन-शरीराच्या एकाग्रतेचा कस लावणारा कलाप्रकार चित्तथरारक हालचालींनी आपल्याला बसल्या जागी खिळवून ठेवतो.
शंकराने परशुरामाला शिकवलेल्या या विद्येमागे वेदिक-पौराणिक पार्श्वभूमीही आढळते.
कलरीपयट्टू ही युद्धक्षेत्राची रणनीती नसून हे समोरच्या शत्रूपासून सावध राहत त्याला घायाळ न करता शिताफीने त्याच्यावर वार करायचं- स्वसंरक्षणाचं तंत्र आहे.
यात कायिक हालचालींबरोबर तलवारी, भाले, खंजीर आदी शस्त्रांचा वापर होतो.

भडक हिरव्या, पिवळ्या, लाल रंगाच्या छटा वापरून मुखवट्यावजा केलेला मेकअप, डोक्यावर चढवलेला आणि विशिष्ट पौराणिक देव-दानवाला साजेलसा प्रचंड मुकुट, भरजरी आणि पायघोळ वेशभूषा आणि डोळे विस्फारून; हस्तमुद्रा आणि पदलालित्याची सांगड घालत नर्तकाने केलेले अर्थपूर्ण  कथन म्हणजे ‘कथकली‘. केरळपलीकडे कथकली नृत्यप्रकार प्रचलित नसला तरी केरळला गेल्यावर त्याची अनुभूती घेणं हे अनिवार्यच समजा! बहुतांशी पुरुष नर्तक सादर करत असणाऱ्या या नर्तनात त्याची पूर्वतयारी पाहण्याची सोयही या सेंटर मध्ये उपल्बध आहे. 

Published by bha2pa

Real Places, Real People, Real Stories. Bharatiya Touring Party (Bha2Pa) a Marathi creator page travels in all possible directions to explore travel destinations, communities, cultures, tastes and life across the globe. BhaDiPa Contact Emails Below! For Business Enquiries: brandsolutions@gulbadantalkies.com For Social Media Queries: socialmedia@gulbadantalkies.com For Live Events: live@gulbadantalkies.com For Internships and Jobs: jobs.bhadipa@gmail.com For Stand-Up Comedians: smsbhadipa@gmail.com For Writers: bhadipa.writers@gmail.com For Actors: casting.bhadipa@gmail.com Other General Enquiries/Collaborations: bha2pa@gmail.com

Design a site like this with WordPress.com
Get started