बगाड बघितलंत का?

फोटो- रणवीर पोळ

आम्ही अंबेचे गोंधळीssss
झांझ-संबळ-तुणतुण्याच्या तालावर निनादत निघालेली गावच्या जत्रेची मिरवणूक… बैल गाडीला जुंपलेल्या दगडी चाकाच्या रथावर; उभारलेला लाकडाचा उंचच उंच खांब आणि त्यावरच्या आडव्या फळीच्या एका टोकाला फुलं-पताकांच्या दाटीवाटीत जीव मुठीत धरून लटकलेला संजय नार्वेकर!
‘अगं बाई अरेच्या!’ या धम्माल सिनेमातलं हे दृश्य पाहताना त्याची दया तर येतेच पण राहून राहून प्रश्न पडतो कि ही नेमकी भानगड आहे तरी काय…?!

सिनेमातील दृश्य


तर हा आहे शैव परंपरेतला शेकडो वर्षांची परंपरा असणारा नवस फेडण्याचा ग्रामीण उत्सव.
नवस बोललेल्या कुटुंबातल्या सदस्यानी अक्षरशः स्वतःचा जीव टांगणीला लावायचा आणि गावातून मंदिरापर्यंत बैलगतीनं मानाचं स्थान मिरवायचं अशा या गंमतशीर मिरवणुकीला ‘बगाड’ म्हणतात.
गावच्या वेशीपासून वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीत रथ उभा करून, सी-सॉवजा असणाऱ्या या खांबाचे दुसरे टोक गरागरा फिरवून बगाडस्वाराला रथाची प्रदक्षिणा करवतानाच्या प्रसंगाला तर बघ्यांची विशेष गर्दी जमते.

फोटो- सुमित कांबळे

चैत्र पौर्णिमा-रंगपंचमीचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी-कष्टकरी वर्गात भरणाऱ्या बगाडाच्या जत्रेला मोठ्या दिमाखाचा मान आहे.
इतरत्र देशभरात झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आंध्रप्रदेश या राज्यांत ‘चरक पूजा’, ‘सिरीमनू’, ‘नील पूजा’ या नावांनी हा उत्सव साजरा केला जातो.

सिरीमनू उत्सव

बगाड निघणार म्हंटल्यावर त्या मिरवणुकीत नाचायला, रात्रभर मंदिरात चालणाऱ्या अभंग-टाळवादनात, देवाच्या गजरात तल्लीन व्हायला आलेल्या गावकऱ्यांचा हुरूप या उत्सवानंतर द्विगुणित झालेला दिसतो.
साताऱ्यात भरणारी बावधानची बगाड यात्राही प्रसिद्ध आहे.

उत्सवाची पाळंमुळं


चरक अर्थात चक्र हे सूर्याचं प्रतीकात्मक रूप. ना फांद्या ना मुळं, २०-३० फूट लांबच लांब बुंधा असणारं चरकाचं झाड हे शिव-शक्तीचं (अर्धनारीश्वराचं) निवासस्थान समजलं जातं.


वेदिक काळात चैत्र पौर्णिमेला इंद्रदेवाने शंकराची पूजा केल्याचे संदर्भ आढळतात.
या परंपरेचा मान राखत, शंकर आणि पार्वतीला म्हणजेच ‘पुरुष-प्रकृतीला’ समर्पित करण्यासाठी हे मानवरूपी चक्र फिरवून यज्ञ केला जातो. याद्वारे सूर्य आणि पृथ्वीचं मिलन घडवून आणत शेतकरी सुगीची कामना करतात.

या सर्व प्रतीकांचा विचार करता ही पूजा नेमकी कशी आणि केंव्हा सुरु झाली याचा मात्र थांग लागत नाही. पश्चिम बंगाल मध्ये लटकणाऱ्यांच्या पाठीतल्या त्वचेत लोखंडाने टोचून त्यांना त्या खांबाभोवती फिरवले जाई. ही घातक प्रथा ब्रिटिशांनी १८६० च्या दरम्यान बंद पाडल्याचे दाखले उत्सवाचे ब्रिटिशकालीन अस्तित्व समोर आणतात. यांनतर दोरखंडाने बांधून लटकवण्याची रीत सुरु झाली.

महाराष्ट्रात बैलगाडीच्या रथावर हे लाकडाचे चक्र उभारून त्यावर दोरीचा सजवलेला पाळणा नवसकर्त्यासाठी केला जातो. बैलांच्या निवडीपासून ते निवडलेल्या झाडाचे लाकूड तासून त्याची पूजा करेपर्यंत, महिनाभरापासून बगाडाची लगबग गावात सुरु होते.
गावातल्या ज्या कुटुंबाचा नवस आहे किंवा फेडला गेलाय; ते मानाचं कुटुंब पिढ्यानपिढ्या बगाडात सामील होतं. जे लटकवले जातात त्यांना ‘शेलकरी’ संबोधतात तर जे रथात उभे राहून येतात त्यांना ‘वीर’.

देवीच्या जत्रेतलं बगाड असलं तरी त्यात स्त्रिया उभ्या राहत नाहीत. रस्त्यात गोमूत्र शिंपडत, वाजत गाजत निघालेली ही मिरवणूक मानाच्या मंदिरात पोहोचल्यानंतर देवाला दंडवत घालण्यासाठी, मीठ-मिरचीचं ताट देवाला वाहण्यासाठी बगाडातल्या वीरांच्या पत्नी-माता सहभागी होतात.
ग्रामीण महाराष्ट्रात अजूनही पाळी दरम्यान महिलांनी देवाच्या कामात सहभागी होऊ नये हा विचार असल्यानं, बगाडाच्या वेळी जर शिवा-शिवी झाली तर बैल परत मागे फिरवण्याची वेळही स्थानिकांनी आणली आहे.

जुन्नर जवळील पारुंडे गावातल्या ब्रह्मनाथ मंदिराच्या बगाडाचं हे टिपलेलं दृश्य. ‘काशीची दुसरी गादी’ म्हणून मान असलेलं हे देवालय नाशिकच्या कुंभ मेळ्यावेळी भाविकांच आश्रयस्थान असतं.

Published by bha2pa

Real Places, Real People, Real Stories. Bharatiya Touring Party (Bha2Pa) a Marathi creator page travels in all possible directions to explore travel destinations, communities, cultures, tastes and life across the globe. BhaDiPa Contact Emails Below! For Business Enquiries: brandsolutions@gulbadantalkies.com For Social Media Queries: socialmedia@gulbadantalkies.com For Live Events: live@gulbadantalkies.com For Internships and Jobs: jobs.bhadipa@gmail.com For Stand-Up Comedians: smsbhadipa@gmail.com For Writers: bhadipa.writers@gmail.com For Actors: casting.bhadipa@gmail.com Other General Enquiries/Collaborations: bha2pa@gmail.com

One thought on “बगाड बघितलंत का?

Leave a reply to Neel Salekar Cancel reply

Design a site like this with WordPress.com
Get started